ajinkyayelai
1 post
Don't wanna be here? Send us removal request.
Text
Unknowns Diary
कधी एकदाची कामं संपणार आणि लिहायला सुरुवात करणार असं झालं होतं. सगळी कामं संपवून एकदा लिहायला सुरुवात केली की मग कशी लिहायला चांगली ४-५ तासांची बैठक बनते. पण आज सकाळी सकाळीच लेले काकी येऊन बसलेल्या गप्पा मारायला. गप्पा मारायला खूप आवडतं त्यांना. आणि माझ्याकडे काय वेळच वेळ असतो. एखाद्याकडे गप्पा मारायला विषय नसेल तर त्याने लेले काकींकडे जावं त्यांच्याकडे चिक्कार विषय पडलेले असतात. मलाही नाही लागत विषय गप्पा मारायला.
आता आजचच पाहाना. अंजली बाईने राणादाला ओळख दिली यावरून १ तास गप्पा मारत बसल्या. मुळात माझ्याकडे TV नाही त्यामुळे राणादा आणि अंजली बाई कोण हे समजण्यात माझे सुरुवातीचे १० मिनिटे गेली. मग हे नवरा बायको असलेले राणादा आणि अंजली बाईंमध्ये असं काय झालेलं की अंजली बाई राजा राजगोंडा म्हणून आलेल्या राणादाला ओळख देत न्हवती हे समजण्यात पुढची १५ मिनिटे. मग त्यांची नातीगोती, गावातलं राजकारण, त्याचं गायकवाड घराणं आणि याप्रमाणे संपूर्ण सिरीयलचा इतिहास समजून घेण्यात २०-२५ मिनिटे गेली. शेवटी लेले काकांनी बोलावलं म्हणून नाहीतर अजून अर्ध-एक तास गप्पा चालल्या असत्या.
त्या गेल्या आणि दरवाजा लावून परत कामाला सुरुवात करेपर्यंत दारावरची बेल वाजली. दुधाचे पैसे घ्यायला विठ्ठल आला होता. त्याला गेल्या ३ महिन्यांचे दुधाचे पैसे द्यायचे राहिलेले. मी कितीदा त्याला द्यायचा प्रयत्न केला.
पण म्हणायचा “परत येतो पैसे घ्यायला. तुम्ही तर इथेच आ��ात, का कुठे पळून जाणार आहात. आज मला उशीर होतोय, ११ ची लोकल पकडायचीय.”
आज कुठे त्याला परत यायला वेळ मिळाला होता. जनावरांसाठी आणि शेतीसाठी काही खरेदी करायची होती म्हणून गावाला आज उशिरा जाणार होता.
मी म्हटलं ”आज निवांत आहेस तर बस जरावेळ. चहा पी, मग जा.”
नाही म्हणत होता. शेवटी बसला.
चहा पितापिता गप्पागोष्टी सुरु केल्या. कामशेत वरून लोकलने पुण्याला आणि मग पुणे स्टेशन जवळ ठेवलेल्या सायकलने दररोज सकाळी गाईचं ताजं दुध आपल्यापर्यंत कसं पोहोचतं, दुधकाढण्यासाठी त्याच्या घरातल्या सगळ्यांची पहाटेची लगबग, त्यानंतर वेळेत लोकल पकडण्यासाठीची त्याची धावपळ असं सगळं सांगितलं त्याने. त्याच्या घरच्यांबद्दल, मुलाबाळांबद्दल सांगितलं.
त्यांच्याकडे वडिलोपार्जीत आलेली २ एकर शेती आहे. पूर्वी त्यांच्याकडे घरची गरज भागवतील एवढीच जनावरं होती. गेल्या काही वर्षांपासून पाऊसपण दडी मारत असतो. १०वी पर्यंतचंच शिक्षण झालेलं, तरीपण व्यावसायिक ज्ञान होतं. शेतीतून येणारं उत्पन्नपण कमी होतं चाललेलं. म्हणून गेल्या ६-७ वर्षांत शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय त्यानं वाढवला. चांगला पैसा मिळतो पण उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची कमतरता जाणवते. गेल्या उन्हाळ्यात २ जनावरं दगावली बिचारी. सरकार चारा छावण्या सुरु करत तिथे ठेवावं लागत जनावरांना मग कुठे चारापाणी मिळतो. कसंतरी करून कुटुंब चालवत होता. हा पण पूर्वीपेक्षा घरची परस्थिती आता सुधारली होती. मुलांना चांगलं अर्धा-पाऊण तास गप्पा झाल्या. खूप वेळ झाला होता एव्हाना गप्पा सुरु होऊन.
शेवटी तोच म्हणाला “चला येतो नाहीतर काम राहून जायचं”.
जाताजाता म्हणाला “Thank you चहासाठी. गेली कित्येक वर्ष पुण्यात दुध देतोय कोणी चहा प्यायला थांबवलं न्हवतं आणि ह्या सदाशिवपेठेत तर नाहीच नाही. तुम्ही आवर्जून थांबवलतं. मनमोकळ्या गप्पा मारल्या. बरं वाटलं.”
बराच वेळ झाला होता आता. माझी कामही जवळपास झालीच होती. सकाळपासून आता कुठे लिहायला बसायला कामातून उसंत मिळत होती. कथेविषयी कालपासून डोक्यात बरेच points सुचले होते ते कागदावर उतरवायचे होते. शेवटी १२ च्या आसपास लिहायला सुरुवात केली.
1 note
·
View note