Tumgik
#लता मंगेशकर यांनी आशा भोसले यांना भेट दिली
airnews-arngbad · 2 years
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२२ सायंकाळी ६.१०
****
·      पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत समारंभपूर्वक प्रदान.
·      औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्ग, औरंगाबाद शहरात मेट्रोसह डबलडेकर उड्डाणपुलांच्या दोन मार्गिका, वेरुळ अजिंठ्यात पर्यटनवृद्धीसाठी हेलिकॉप्टर सुविधा आदी प्रकल्पांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून घोषणा.
·      मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पाऊस; हिंगोली जिल्ह्यात एकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू.
आणि
·      ९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप.
****
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत षण्मुखानंद सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. संत मीराबाई यांची प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रसिद्ध गायिका संगीतकार मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यात उपस्थित आहेत. राष्ट्रनिर्मितीमध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातल्या योगदानाबद्दल तरुण गायक राहुल देशपांडे यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार, चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार, तर सामाजिक कार्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून ते आज देशातल्या नागरिकांशी संवाद साधत होते. रोखविरहित व्यवहार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग झाल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केलं. देशात सध्या दिवसाला वीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार UPI च्या माध्यमातून होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. १८ मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर, देशातल्या नागरिकांनी सुटीच्या काळात जवळपासच्या संग्रहालयांना भेट द्यावी असं आवाहन मोदी यांनी या मनोगतात केलं. दिल्लीत नव्याने उभारण्यात आलेलं प्रधानमंत्री संग्रहालय लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज अमृत सरोवर मोहिमेची घोषणाही केली. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात पंचाहत्तर सरोवरं निर्माण केली जाणार आहेत. आज साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या औचित्यानं पंतप्रधानांनी देशभरातल्या सगळ्या ग्रामसभांना संबोधित केलं.
****
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्ग, औरंगाबाद शहरात मेट्रोसह डबलडेकर उड्डाणपुलांच्या दोन मार्गिका, वेरुळ अजिंठ्यात पर्यटनवृद्धीसाठी हेलिकॉप्टर सुविधा आदी प्रकल्पांची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं विविध रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते.
या प्रकल्पांमध्ये औरंगाबाद ते तेलवाडी, नगर नाका जंक्शन ते केंब्रीज स्कुल, तसेच शिवूर ते येवला या तीन हजार ३१७ कोटी किंमतीच्या ८६ किलोमीटर लांबीच्या तीन महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण, तसंच औरंगाबाद ते पैठण या ४२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचं चौपदरीकरण, विविध रस्त्यांचं दुहेरीकरण तसंच काँक्रीटीकरण अशा एकूण पाच हजार पाचशे ६९ कोटी रुपये कामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं.
औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग १० हजार कोटी रुपये खर्चाचा असून तो पैठण, बीड, आणि अहमदनगर या भागातून जाणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वा तासात पार करता येणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. वेरुळ तसंच अजिंठा इथं पर्यटकांकरीता सोयीसुविधा उपलब्ध करुन हेलिपॅड उभारणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. यामुळे पर्यटनाचा विकास होऊन नवीन रोजगार निर्माण होतील. याकरता लागणारे रस्त्याचे जाळे २०२४ पर्यंत निर्माण करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. धुळे सोलापूर महामार्गावर औट्रम घाटातला बोगदा चार पदरी करणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली.
औरंगाबाद‍जिल्ह्यात २०२४ पर्यंत २५ हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिल. शहरातल्या डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेच्या सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाबाबत गडकरी यांनी माहिती दिली, ते म्हणाले –
औरंगाबादमध्ये एमआरटीएस Mass Rapid Transport system म्हणजे मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर जो तयार आहे त्याचंही काम महामेट्रोकडून होत आहे. दोन कॅरिडोअर राहणार आहेत. पहिला कॅरिडोअर चिकलठाणा ते क्रांती चौक ते औरंगाबाद रेल्वेस्थानक असा असेल.ज्याची लांबी जवळपास १२ किमी असणार आहे. आणि याच कॅरिडोअरमध्ये चिकलठाणा ते क्रांतीचौक हा नऊ किमी लांबीचा डबलडेकर फ्लायओवरचा समाविष्ट आहे. दुसरा कॅरिडोअर हा औरंगाबाद रेल्वेस्थानक - हर्सुल टी पॉईंट ते सिडको बसस्थानक पर्यंत असेल ज्याची लांबी १३ किमी असेल आणि याकरता मेट्रो देखिल योजना तयार करत आहे.
केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मनमाडपासून ते नांदेडपर्यंत ७५० कोटी रुपये निधी खर्च करुन रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्याने प्रदुषण कमी होईल, रेल्वे दुहेरीकरण, विद्युतीकरण, आणि पीटलाईन या सुविधा औरंगाबादमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचं, दानवे यांनी सांगितलं. औरंगाबाद शहर ���े राज्याचा औद्योगिक केंद्रबिंदू असल्याने रस्त्याच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत असल्याची भावना डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केली.
****
 २०१३ पासून रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लावलेल्या रुपी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना आता दिलासा मिळणार असून, ठेव विमा महामंडळाकडून विम्यापोटी सहाशे सत्त्याऐंशी कोटी रुपये प्राप्त झाल्यामुळे, पाच लाख रुपयांपेक्षा कमी ठेव असणाऱ्या सुमारे चौसष्ठ हजार ठेवीदारांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न मात्र अजूनही अनिर्णित असून, पाच लाखांहून जास्त ठेव असणाऱ्या ठेवीदारांचा प्रश्न कायम आहे.
****
गृह विभागाच्या बळकटीकरणाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. नाशिक इथे आज सकाळी महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. या दोन वर्षात पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण एक हजार एकोणतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी राजकीय दबावाला कधीही बळी पडू नये, तसंच पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल, अशी वर्तणूक ठेवू नये, असं मत पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. अकादमीच्या शिक्षण इमारतींसाठी आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना पोलिसांच्या गणवेशाची प्रतिष्ठा आणि मर्यादा नेहमी सर्वोच्च ठेवावी आणि सामान्य नागरिकांशी सौजन्यानं वागावं, असं मत व्यक्त केलं. प्रशिक्षणार्थींनी दिमाखदार सशस्त्र संचलन करत उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना यावेळी मानपत्रं देण्यात आली.
****
मराठवाड्यात काही भागात काल रात्री पाऊस झाला. नांदेड, उस्मानाबादसह हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस झाला असून, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, औंढा, वसमत, सेनगाव या तालुक्यात हळद, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांवरच्या आंब्यांची पडझडही झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या बाराशीव हनुमान या गावात हळद झाकण्यासाठी शेतात गेलेल्या रामप्रसाद चव्हाण या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरु असलेल्या ९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. आज या संमेलनात वाचन साहित्य आणि आधुनिकता, बालवाचन काही उपाययोजना, बाल कादंबरी वाचन, बालसाहित्यिकांशी गप्पा इत्यादी कार्यक्रम झाले. सायंकाळी अवधुत गुप्ते संगीत रजनीनं या साहित्य सोहळ्याची सांगता होणार आहे.
****
0 notes