Tumgik
Text
दि. २७ जुलै २०२० श्रावण शु. ८ सोमवार
Tumblr media
एखादा शल्यचिकित्सक (Surgeon) त्याच्यासमोर आलेल्या रुग्णाच्या जखमी किंवा रोगी शरीराची शस्त्रक्रिया करतांना किती आत्मविश्वासाने आणि कोणतीही भीती, किळस किंवा तमा न बाळगता, शांत बुद्धीने आपले हात चालवतो? तो जितका शांत, स्थिर आणि एकाग्र राहील, यावर त्या शस्त्रक्रियेचं यशस्वी होणं अवलंबून असतं. त्याचपध्दतीचं राजकारण करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. मूळ छायाचित्र कलाकार असलेले उद्धव राजकारणात येण्यास सुरुवातीपासून तितकेसे उत्साही कधी नव्हतेच. पण मा. शिवसेनाप्रमुखांना साथ देण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेचे युवा नेते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मार्गे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना कार्यकारी अध्यक्ष हा मोठा प्रवास त्यांनी अनेक यशापयश मिळवत केलेला आहे. त्यांच्याच नेतृत्वात मुंबई महापालिकेच्या सत्तेवर आपली मांड मजबूत ठेवण्यात शिवसेनेला २००२ पासून सतत यश मिळतं आहे.
Tumblr media
उद्धव ठाकरेंच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांना त्यांच्या राजकीय समजूतीविषयी हिणवण्यात आलं. त्यांच्या प्रत्येक राजकीय चालीला कमी लेखल्या जाऊ लागलं. इतकंच काय त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक महत्वाचे नेते शिवसेनेतून बाहेर गेले. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, भास्कर जाधव या नेत्यांनी शिवसेनेला खिंडार पडण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव यावेळी स्थितप्रज्ञ राहिले. जास्त आकांडतांडव न करता ते आपलं राजकारण करत राहिले. पक्षात त्यांनी आपला जम बसविण्यात यश मिळवलं. त्याचीच फलश्रुती म्हणून ते आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. उद्धव स्वतः म्हणतात, 'जगात माझं एकमेव उदाहरण असेल की ज्याच्या कार्यपद्धतीला सुरुवातीपासून कमी लेखल्या गेलं, तो त्या राजाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोचला.' शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या बाबतीत मनोहर जोशींचा दसरा मेळाव्यात घडलेला प्रसंग सगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविला गेला यावरून एक स्पष्ट झालं की, कितीही ज्येष्ठ नेता असला तरी साहेबांनंतर शिवसेनेत फक्त उद्धव यांचाच शब्द प्रमाण राहील.
Tumblr media Tumblr media
आता सध्या महाविकासआघाडी सरकारचं नेतृत्व उद्धव करत आहेत. यावेळी पक्षामध्ये नंबर २ कोण? यावरून वाद सुरू होऊ नये, म्हणून आदित्य यांना कॅबिनेटमध्ये घेण्याचा निर्णय त्यांना फायदेशीर ठरतो आहे. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या सावलीत त्यांना हे सरकार चालवायचं आहे. त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा होत आहेत. भाजप सारखा मजबूत आणि भरपूर संसाधने बाळगून असणारा विरोधी पक्ष असूनही राज्यकारभार करणं ही सोपी गोष्ट नाही. फेसबुक live च्या माध्यमातून वेळोवेळी जनतेसमोर येण्याने लोकांना ते कुटुंबवत्सल मुख्यमंत्री वाटत आहेत. भाजप सरकारच्या काळात मुंबई महापालिकेवर वचक मिळवण्यासाठी आणि शिवसेनेला धाक निर्माण करण्यासाठी नियुक्त केलेले सनदी अधिकारी अजोय मेहता यांचे आणि उद्धव यांचेच सूर चांगले जुळले आहेत. ते इतके की मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुदतवाढ देऊ केली आहे. अजित पवार यांच्यासारख्या time bomb प्रकाराच्या नेत्याला सांभाळण्यातही उद्धव यशस्वी होतांना दिसत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्यावेळी स्वतः शरद पवार जेव्हा मातोश्रीवर जाऊन 2 तास मुख्यमंत्र्यांची समजूत घालतात तेव्हा लक्षात येतं की हे काही रिमोट कंट्रोल वालं सरकार नाही. काँग्रेस पक्षाला तर ध्यानीमनी नसतांना सत्तेचा लाभ झाला आहे. त्यामुळे त्यांचे काही नेते आपलं उपद्रवमूल्य विसरून कशाहीप्रकारे वागत आहेत. त्यांना ताब्यात आणण्यासाठी मी मुख्यमंत्री पद आणि सत्ता सोडतो इथपर्यंत सांगून उद्धव यांनी करारीपणाचं उदाहरण दाखवून दिलं आहे. एकूण काय तर उद्धव ठाकरे आपल्या बद्दलचे सगळे गैरसमज हळू हळू हाणून पाडत आहेत.
Tumblr media
उद्धव आज वयाच्या साठीत प्रवेश करत आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची नवी इनिंग सुरू केली आहे. महाराष्ट्राला मिळालेल्या सुसंस्कृत नेत्यांच्या यादीतही ते अगत्याचं स्थान बाळगून आहेत. साहेबांच्या विचारांना धरून नवीन विचार शिवसेनेत रुजवण्यातही त्यांना यश मिळतं आहे. शिवसेना ~ राष्ट्रवादी काँग्रेस ~ काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग करून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. ही युती करणं योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय आहे. तसंच भाजपने रात्रीतून राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणे हाही चर्चेचाच विषय आहे. असो 'सत्तातुराणां न भयं न लज्जा' हे म्हणतात ते काही खोटं नाही. उद्धव यांना दीर्घायुष्य मिळो आणि महाराष्ट्राच्या भल्याचं, हिताचं काम त्यांच्याहातून घडो! त्यांना आज त्यांच्या ६० व्या वाढदिवशी मनःपूर्वक शुभेच्छा!
Tumblr media
(रेखाचित्रे इंटरनेटवरून साभार)
1 note · View note
Text
दि. १७ जुलै २०२० शुक्रवार
आज हे लिहितो आहे त्यावेळी कोरोना बाधित रुग्णांची संख्या औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात एकूण १०,०८२ इतकी झाली आहे. यात समाधानकारक बाब म्हणजे आजपर्यंत ५८६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि केवळ ३८३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या काळात रुग्णांचा आलेख वेगाने वर सरकत असतांना भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यात परत हे संकट सगळ्यांच्यासाठीच नवीन असल्याने system मधील प्रत्येक व्यक्ती, डॉक्टर आणि सर्वसामान्य नागरिकांनाही रोज नव्या संकटाला तोंड द्यावं लागत होतं. अजूनही हे दुष्टचक्र घोंगावतच आहे. सुरुवातीच्या काळात प्रशासनात आणि लोकप्रतिनिधीत नसलेली सुसूत्रता यामुळे शहरात या साथीचा वेगाने फैलाव झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यामानाने प्रादुर्भाव रोखयाला यंत्रणेला यश आलं होतं. पण Unlock १ सुरू झाल्यानंतर काही दिवस जिल्ह्याला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती झाली होती. प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रयत्न करत होतेच पण त्यात ते कमी पडत होते. त्याबद्दलही मी लिहिलं होतं.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव आ���ा झपाट्याने वाढत असतांना अधिकाऱ्यांच्या सरकारी निवासस्थानांमध्येही कोरोनाने शिरकाव केला होता. मनपाचे आयुक्त आणि प्रशासक श्री. आस्तिक कुमार पांडे यांनाही सपरिवार Home quarantine व्हावं लागलं होतं. आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी औद्योगिक उत्पादन सुरू केल्या गेलं. तेव्हा बजाज सारख्या आस्थापनेत कोरोनाचा विस्फोट झाला. आकडे झपाट्याने वाढू लागल्यावर यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा शहर lockdown केल्या गेलं. यावेळचं lockdown पूर्वनियोजित आणि व्यवस्थितपणे तयारी करून अंमलात आणलं गेल्याने शहरवासीयांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता जराशी परिस्थिती नियंत्रणात येईल असं दिसून येतंय. ग्रामीण भागातही रुग्ण सापडू लागले असले तरी यंत्रणा त्याची हाताळणी समर्थपणे करतांना दिसते आहे. Contact tracing चं काम उत्तमप्रकारे सुरू झालंय. शहरात mobile swab collection task force, शहराच्या प्रवेश points वर Anti-gen tests यामुळे संख्या वाढताना दिसत असली तरी त्यामुळेच contact tracing करणं सोपं जाऊन साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यात त्याचा उपयोग होईल. ग्रामीण भागात contact tracing करणं जरा अवघड होईल असं मला वाटलं होतं. पण वेरुळला covid चा पहिला रुग्ण सापडल्याबरोबर प्रशासनाने केलेल्या तत्पर कारवाया जवळून बघितल्यावर माझा गैरसमज दूर झाला. त्याचबरोबर Plasma पद्धतीने रुग्णांच्या उपचारासाठी बरे झालेले रुग्णही स्वतःहून Plasma दान करण्यास पुढे येत आहेत, त्यामुळे उपचार घेत असलेले रुग्ण गंभीर अवस्थेत जाण्यापासून नक्कीच वाचतील.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर हे आपापल्या team सोबत जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. शहर आणि जिल्ह्यातील नागरिकही त्यांना भरपूर प्रतिसाद देत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात होणारे वाद कटाक्षाने टाळले जात असल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे हे नक्की. सोमवारपासून पुन्हा एकदा शहर unlock होत असलं तरी आपण सर्वांनीच खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. तरच या lockdown चा उपयोग होईल. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या साथीचा प्रादुर्भाव लवकर दूर होऊन परत एकदा सगळं सुरळीत सुरू होवो. कारण काळजी घेणं आणि प्रार्थना करणं याच्याशिवाय सध्या, आपण दुसरं करू तरी काय शकतो!
Tumblr media
0 notes
Text
दि. २८ जून २०२० रविवार
भारतासारख्या खंडप्राय देशाचं पंतप्रधान होणं हे भाग्यांचं असतं. पण शपथविधीच्या पंधरा दिवसानंतर जर संपूर्ण देश World bank आणि IMF च्या defaulter यादीत जाणार असेल तर हे भाग्यकारक काम तितकंच भयावह असू शकतं. सन १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जेव्हा भारताचे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांच्यावर अशीच परिस्थिती ओढवली होती. तेव्हा त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ञ अर्थमंत्र्यांकरवी भारताला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं.
सन १९९१ आर्थिक संकट
भारतावर १९९१ चं आर्थिक संकट आलं, त्याची अनेक कारणं सांगितली जातात. त्यामध्ये राजकीय अस्थिरता (१४ वर्षांत ७ पंतप्रधान), FDI मध्ये कमालीची घसरण, जागतिक विकास दर ४.५% हुन २.२५% वर येणं, Foreign Exchange reserves मध्ये तूट, वगैरे. या सगळ्या कारणांमुळे भारत विचित्र अशा आर्थिक संकटात सापडला गेला. ज्यामुळे महागाई वाढीचा दर (rate of inflation) ९.४% हुन १३.९ टक्क्यांवर गेला. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर (GDP) ६.५ हुन ५.५% झाला. भारताला पुढच्या महिन्यासाठीच्या वापराच्या पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीसाठीही Foreign exchange उरले नव्हते. देशावर ७० अब्ज डॉलर्स इतके अवाढव्य विदेशी कर्ज होते. इतक्या मोठ्या आर्थिक संकटाचा भारताने कधी सामना केलेला नव्हता.
आर्थिक उदारीकरण (Economic liberalisation)
नरसिंह राव यांनी त्यांच्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितलं होतं की 'सरकार औद्योगिकरणाच्या (industrialization) च्या मार्गात येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि जगभरात उपलब्ध होत असलेल्या संधीच्या मदतीने देशाला स्पर्धेत टिकण्यासाठीची कठीण पावले उचलायलाही माझं सरकार कमी पडणार नाही.' यातून त्यांची दृढ इच्छाशक्ती दिसून येते. नरसिंह राव यांनी भारतातील कोटा परमिट (license) राज हटवून भारतीय अर्थव्यवस्थेची दारं विदेशी गुंतवणूकीसाठी उघडी केली. भारतासारख्या स्वदेशीप्रिय अस्मिता असलेल्या देशात हा निर्णय धाडसी होता. पण तसंही त्यांच्याकडे या संकटातून वाचण्यासाठी याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. त्यांच्या या निर्णयामुळे स्पर्धा वाढली. व्याजदर कमी केले गेले त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. लालफितशाहीला आळा बसला. याच्यासाठी डॉ. मनमोहन सिंघ यांनी अर्थमंत���री म्हणून अपार मेहनत घेतली. पण नरसिंह राव यांनी त्यांना पूर्ण संरक्षण दिलेलं होतं. अनेकवेळा आर्थिक उदारीकरणामुळे अर्थमंत्र्यांवर टीकाही होत होती, पण नरसिंह राव यांनी स्पष्ट नमूद केलं की टीका माझ्यावर करा, अर्थमंत्र्यांवर नाही.
चाणक्य
ज्याप्रमाणे नरसिंह राव डॉ. मनमोहन सिंघ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले त्यामुळेच डॉ. सिंघ हे धैर्याचं काम करू शकले. इतकंच काय १९९१ च्या आर्थिक सुधारणांमुळे होणाऱ्या आर्थिक विकासाचं श्रेय सुद्धा राव यांनी डॉ. सिंघ यांनाच दिलं. आर्थिक सुधारणांसाठी महत्वाचं असलेलं राजकीय पाठबळ आणि स्थैर्य राव यांनीच उभं केलेलं होतं. त्यामुळेच नरसिंह राव यांना 'Father of Indian economic reforms' म्हणूनही ओळखल्या जाऊ लागलं. आर्थिक विकासासोबतच भारताला अणुशक्ती बनवण्यातही राव यांचा मोठा वाटा आहे. पोखरण येथे अणूचाचणी करण्यासाठीची बरीचशी तयारी त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाली होती.
साहित्य
भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून नरसिंह राव यांनी शपथ घेतली. राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यानी बरीच कामगिरी केली आहे. त्यांची मातृभाषा जरी तेलगू असली तरी त्यांचं मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली इ. भारतीय भाषा आणि इंग्लिश, फ्रेंच, अरेबिक, स्पॅनिश, जर्मन अशा १७ भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांचं बरचसं शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाल्यामुळे मराठी त्यांना अस्खलितपणे येत होती. मराठीतल्या हरी नारायण आपटेंच्या सुप्रसिद्ध 'पण लक्षात कोण घेतो?' या कादंबरीचा तेलगू अनुवाद त्यांनी केलेला आहे. राव पंतप्रधान असतांना लोकसभेचे विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांनाही मराठी अवगत असल्याने दोघांच्या मराठीत झालेल्या संवादाचे अनेक किस्से सांगितले जातात.
शोकांतिका
१९९७ नंतर त्यांनी राजकारणातुन जवळजवळ निवृत्ती घेतली होती. माजी पंतप्रधान असूनही काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती त्यानंतर दिसत नव्हती. २००४ ला त्यांचं ह्रदयविकाराने निधन झालं. त्यांचं पार्थिवही काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवू दिल्या गेलं नव्हतं. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात होत असताना इतक्या महान नेत्याची काँग्रेस पक्षाला आठवण न येणं हे दुर्दैवी आहे. त्यांच्या स्मृतीला आजचा blog माझ्यातल्या राजनीतीशास्त्राच्या विद्यार्थ्याकडून आदरांजली म्हणून समर्पित.
Tumblr media
1 note · View note
Text
दि. २२ जून २०२० सोमवार
परवा MPSC चा निकाल जाहीर झाला. कोरोनाकाळात सर्वच विचित्र बातम्या येत असतांना उत्तीर्ण झालेल्यांसाठी आणि त्यांच्या आप्त-इष्टमित्रांसाठी तो सुखावणाऱ्या क्षणांपैकी एक क्षण होता. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! MPSC असो किंवा UPSC त्याचा चषक मिळवण्यासाठी काय प्रतीचे कष्ट, जिद्द आणि शिस्त लागते याची मला जाणीव आहे. राज्यसेवा परीक्षे (MPSC) ला यावर्षी साडेतीन लाखांहून अधिक लोक बसले होते. आणि त्यातले उत्तीर्ण किती झाले? फक्त 450! म्हणजे टक्केवारीने जरी बोलायचं झालं तर राज्यसेवा परीक्षेत 0.001% लोकांना यश मिळालं आहे. MPSC/UPSC हा माझाही dream job आहेच. पण त्याच्या झालेल्या वायफळ उदात्तीकरणामुळे तो बाजार होऊन बसला आहे. लाल दिव्याची गाडी (ती आता मिळत नाही), मानमरातब, सत्ता, अधिकार आणि पद याचं इतकं मोठं चित्र करून ठेवलं आहे की, आपण जनतेचे सेवक आहोत ही अधिकाऱ्यांची जाणीव जवळजवळ पुसल्या गेली आहे. १९९० नंतर महाराष्ट्रात या परीक्षा देणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. ते आता इतकं झालं आहे की अर्धा मराठवाडा, विदर्भ पुण्यात आणि अर्धा महाराष्ट्र दिल्लीत सापडेल! या परीक्षार्थींनी आयोगाच्या या परीक्षा म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न करून टाकल्या आहेत.
आपण सध्या UPSC बद्दल बोलू,
UPSC च्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ६ ते ८ लाख इतकी असते. अर्ज करणाऱ्यांची संख्या जरी इतकी असली प्रत्यक्ष परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या कमी असते. जवळजवळ दीड ते दोन लाख हवसे-नवसे-गवसे परीक्षेला गैरहजर राहून 'UPSC चा फॉर्म भरला' यातच आनंद मानतात. म्हणजे अर्ज करणारे ६ लाख आणि प्रत्यक्ष परीक्षेला हजर राहणारे दीड लाख उमेदवार. प्रत्यक्षात परीक्षेला हजर राहणारे दीड ते दोन लाख उमेदवार हजेरी पत्रकावर सही करून पहिला पेपर देतात. पहिलाच पेपर अवघड, डोक्यावरून गेला की जास्त भानगडीत पडता दुसरा पेपर न देता सरळ हॉल सोडून परत येतात. पहिल्या पेपरला हजर असणाऱ्यापैकी काही चेहरे दुपारच्या सत्रात दुसऱ्या पेपरवेळी गायब झाल्याचं दिसतं. म्हणजे अर्ज करणारे वेगळे, हजर राहणारे वेगळे आणि परीक्षा देणारे वेगळे हा फरक लक्षात येईल. इतक्या लोकांतून मुख्यपरिक्षा उत्तीर्ण झालेल्यांपैकी काही मुलाखतीसाठी बोलावले जातात ते १५०० ते २०००. ही संख्या उपलब्ध जागां (vacancy) च्या अडीचपट इतकी असते. UPSC साठी अर्ज करणाऱ्या सहा ते आठ लाखांपासून सुरुवात करून शेवटी पाचशे ते हजार लोकांना अंतिम यश मिळतं. परीक्षेचा अर्ज भरणारे, प्रत्यक्ष परीक्षेस हजर राहणारे, हजर असलेल्यांपैकी परीक्षा देणारे, परीक्षा न देणारे, पास होणारे, नापास होणारे असे बरेच वर्ग आहेत. इतक्या लोकांमधून गाळणी लागून लागून ही संख्या कमी होते. पण इतक्या लोकांना वर्षभर त्या गर्तेत रहावं लागतं.
आपल्या बुद्धीला झेपेल, आपल्या कडून होईल याचा 'practical' विचार न करता बरेचशे लोक निव्वळ त्या खुर्चीमागे धावत असतात. UPSC किंवा MPSC हे केवळ लक्ष न ठेवता पर्यायी वाटा जर तयार ठेवल्या तर ही गुंतागुंत जरा कमी होईल. आपल्याला साहेब नाहीतर 'सेवक' व्हायचंय हा विचार मुळात मनामध्ये रुजवला पाहिजे. अभ्यास ते अधिकारी हा प्रवास करण्यासाठीची खरी चिकाटी असेल तर ते अशक्य नाहीच. पण उगाच हा करतो म्हणून, किंवा त्याने सांगितलं म्हणून करण्यात काहीही अर्थ नाही. शेवटपर्यंत धावण्याची तयारी असेल तर शर्यतीत उतरण्यात तथ्य आहे, पण अर्ध्यातून सोडून देण्यात काहीही अर्थ नाही. शर्थीचे प्रयत्न करुनही यश मिळालं नाही तर तो भाग वेगळा.
"चाहते सब हैं के हो जाए सुरैय्या पे मुकीम ।
पहले पैदा तो करें वैसा कोई अक्ल ए सलीम ।"
- सर अल्लामा इकबाल
यशोशिखर सर करण्याचं ध्येय, स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असतो, पण त्यासाठीची तयारी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा हा एकमेव पर्याय असतो. तूर्तास, आज इतकंच.
Tumblr media
1 note · View note
Text
Lockdown मध्ये वेळ घालवण्यासाठी केलेल्या उद्योगांपैकी एक.. ♥️ 🥭 ✍🏻
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
Text
दि. ११ / ०६ / २०२० गुरुवार
क्या बोलरेली पब्लिक?
वय वर्ष १७ ते २२. फाड फाड इंग्रजी, इंग्रजीसोबत मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी चा चटकदार मसाला, लूक ची तर गोष्टच वेगळी, केस एकतर रंगीबेरंगी किंवा 'one side', गळ्यात साखळ्या, काही सोनेरी काही चंदेरी, अंगावर टॅटू, बटबटीत शर्ट, त्यावर जॅकेट्स, चित्रविचित्र जीन्स, तब्येतीच्या नावाने बोंब, हातात मोठ्ठं घड्याळ, डोक्यात टोपी, दिवस असो रात्र असो डोळ्यावर गॉगल, खुरटलेली दाढी आणि तोंडी सदैव गाणं. 'Rapper' नावाच्या नव्या प्रजातीचं हे वर्णन आहे. शहराच्या कोणत्याही signal वर जेव्हा आपली गाडी थांबलेली असते तेव्हा आजूबाजूला बघितलं तर गर्दीत एकदोन तरी असे तारे दिसून येतात. औरंगाबाद आणि tier 2 शहरात यांचा प्रसार तितकासा झालेला नाही, पण मुंबई, पुणे नागपूर या आणि अशा मोठ्या शहरात भरपूर सुळसुळाट आहे. मुंबईतली धारावी जशी जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे, तशीच ती घराघरात असणाऱ्या rapper लोकांसाठीही हळूहळू प्रसिद्ध होऊ लागली आहे.
मुंबई १७ ऐसी नगरी,
यहां की पब्लिक फुल टू ठगरी,
तू ता पे झगडाझगडी,
मारामारी तगडातगडी
'गली बॉय' सारखा सिनेमा जोया अख्तरला बनवावा वाटणं, त्यात रणवीर सिंघ आणि आलिया भट्ट ला काम करावंसं वाटणं, सिनेमा सुपरहिट होणं, त्याला अकॅडमी अवार्ड्स मिळणं यावरून आपल्याला मुंबईत असलेल्या या जगामागचं दाहक वास्तवाची जाणीव होते. काय सांगायचं असतं यांना? एकतर पर्वा नसते जगाची, आणि कोणी आपली दखल घेईल की नाही याचीही. फक्त जगायचं असतं. आणि तुम्हाला जशी आमची काही पडलेली नाही, तशी आम्हालाही तुमची काही पडलेली नाहीचे हा विश्वास असतो. Hip-Hop किंवा rap करणाऱ्या या मुलामुलींचे रीतसर bands आणि groups बनलेले आहेत. त्यातल्या बऱ्याचशा groups चं काम खरंच creative ही आहे. पण जवळजवळ या सर्व groups चं या क्षेत्रात येण्यामागचं कारण म्हणजे विद्रोह! विद्रोह जो कोणाविरोधात केलेला नाही. फक्त स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेली बंडखोरी. अशा शहरात जिथे श्रीमंतातला श्रीमंत ते गरिबातला गरीब माणूस राहतो त्या मुंबईत त्यांना फक्त आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची आहे. मला rap किंवा hiphop हे काही आवडत नाही. मुळात मी त्याला गाणंच मानत नाही. कदाचित ते माझ्या समजण्याच्या शक्तीच्या बाहेरचं असेल. पण त्या rap किंवा hiphop च्या मागची भावना मला लक्षात येते.
बाबा सेहगल ने भारतात हिंदीत rap चा पहिला यशस्वी प्रयोग केला. बरेच वर्ष त्याने अशा प्रकारची गाणीही बनवली. आता सध्याचं आघाडीचे rapper म्हणजे बादशाह, हनी सिंघ, रफ्तार, Divine, बिलाल शेख (Bantai). प्रत्येकाची rap ची शैली वेगळी आहे. बादशाह, हनी सिंघ, रफ्तार हे मुळात पंजाबी rapper, त्यांच्या गाण्यांतून जास्तीत जास्त श्रीमंतीचा झगमगाट दिसतो. त्यांचे rap आता bollywood मध्येही जोरात चालतात. इतकंच काय, अमिताभ बच्चन यांनीही हनी सिंघसोबत 'Party with Bhootnath' नावाचं गाणं केलं आहे. इतकी त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. Divine, Bantai हे अस्सल मुंबईचे. मी वर लिहिलंय त्या रांगेतले. विद्रोही. लोकमतच्या गेल्यावर्षीच्या दिवाळी अंकात मुंबईच्या या rap विश्वाचं वर्णन 'श्रीमंत आणि माजोरड्या मुंबईच्या पोटात गुप्ती फिरवल्यासारख्या जळजळीत शब्दांत आत्मसन्मानाचं रक्त काढत निघालेल्या हिपहॉपर्सचं जग' असं केलेलं आहे. आणि हे किती बरोबर आहे ते आपल्याला त्या rap चे शब्द ऐकल्यावर लक्षात येतं.
अंबानींच्या जिओने देशात data क्रांती घडवून आणली. आकाशाला भिडणारे data चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. तेव्हापासून या rap industry ने वेग पकडला. त्याच्याआधीही होतंच पण त्याचा प्रसार इतका झालेला नव्हता. गाणं, picture किंवा एखादी file लोक bluetooth किंवा wifi चा उपयोग करून share करत. पण इंटरनेट कमी दरात मिळू लागल्याने ते वापरणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली. Youtube सारखं व्यासपीठ या rapper लोकांना मिळू लागलं. कमी खर्चात, कमी वेळात त्यांचं म्हणणं त्यांना हजारो-लाखो लोकांपर्यंत पोचवता येऊ लागलं. आंतरराष्ट्रीय पातळीच्या rappers चे performances ही सगळ्यांना बघायला मिळू लागले. यातून आपल्याकडच्या मुलांच्या rap चीही गुणवत्ता सुधारायला लागली. आपणही जगाशी स्पर्धा करू शकतो याची खात्री या मुलांना आली. Rap ही स्वतंत्र industry म्हणून उदयाला येण्यासाठीचा हा महत्वाचा टप्पा होता.
Rap वगैरे या गोष्टी आपण आयात केलेल्या आहेत. त्यांच्या टिकाऊपणाबद्दलही प्रश्नचिन्हच आहे. Rap ने entertainment होत असेल, 'भडास' निघतही असेल, पण जसं सकस आहार घेतल्याने शरीर तंदुरुस्त रहातं, तसंच चांगलं गाणं ऐकल्याने मनही तंदुरुस्त रहातं. Rap हे त्या चांगल्या गाण्याच्या प्रकारात येत नाहीच. एखादं rap गाणं वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य करीत राहिलंच याची शाश्वती हे रॅपरलोकसुद्धा देऊ शकणार नाहीत. रॅप सारख्या प्रकारांनी उथळ मनाचा समाज घडला तर आश्चर्य वाटायला नको. पण मुळात त्यांना त्याची काही पडलीये का? हाच मोठा प्रश्न आहे.
Tumblr media
माझ्याकडून या विषयावर लिहिण्याची अपेक्षा न करणाऱ्यांसाठी खास. 😁✍🏻
1 note · View note
Text
दि. ०७ / ०६ / २०२० रविवार
परवा माझ्या लाडक्या आत्याचा msg आला की, 'माझं स्वप्न पूर्ण झालं आहे!' तसं ती नेहमीच अशा गुगली टाकून आम्हाला clean bowled करत असतेच म्हणून माझंही कुतूहल जरा वाढलेलंच होतं. मी विचारलं 'का गं? काय झालं?' तेव्हा ती म्हणाली 'lockdown मुळे का होईना पण मी सलग काही दिवस घरात राहण्याची तिची इच्छा पूर्ण झालीये!' तिचं उत्तर वाचून माझी हसून हसून पुरेवाट झाली! माझ्यासारख्या 'भटकंतीप्रिय' भाच्याकडून तिने अशी अपेक्षा ठेवणं काहीच गैर नव्हतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की 2012 पासून मी सलग एक आठवडा एकदाही एका शहरत थांबलो नाहीये! सतत काही कामाने किंवा विनाकारण सुद्धा मी किमान औरंगाबादला किंवा औरंगाबादहुन वेरुळला येऊन जाऊन आहेच. म्हणून आज माझ्या आवडीच्या विषयावर जरा मला लिहावंसं वाटलं..
प्रिय Longdrive,
कशी आहेस? तुलाही आश्चर्य वाटेल, की कंटाळा आला की मला भेटायला येणारा हा, असले कंटाळवाणे लिहिण्याचे काय उद्योग करतोय! पण परिस्थितीच अशी आहे की तुझ्याकडे (longdrive ला) जाण्याऐवजी, तुझ्या आठवणीत रमण्यापलीकडे माझ्याकडे सध्या काही पर्याय नाहीये. जशी शाळा संपली तशी माझी भटकंतीची हौस भागवण्यासाठी मी तुझी सोबत केली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, माळशेज, अलिबाग, तारकर्ली, गोवा, इंदोर, अहमदाबाद, बेंगलोर, तिरुपती, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि अगदी Lockdown सुरू होण्याआधीपर्यंत सौराष्ट्र आणि राजकोट या आणि अशा अनेक ठिकाणी मी तुझ्यामुळेच जाऊ शकलो आहे. ट्रेनचा प्रवासही मला तितकाच आवडतो. पण दिल्ली आणि चेन्नई वगळता बहुतेक ठिकाणी मी कारनेच गेलो आहे त्यामुळे पहिलं प्रेमही तूच राहिली आहेस. मी मनात आणावं, ठरवावं आणि निघावं हुंदडायला हे नेहमीचंच झालं आहे. त्यामुळे lockdown मध्ये मी सगळ्यात जास्त तुला miss करतोय! वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरात जाऊन तिथले लोक, नवीन नवीन जागा, नवीन खरेदी, तिथलं खानपान अनुभवणं हे माझं आवडीचं काम आहे. (मला खाण्याची आवड असेल हे माझ्याकडे बघून वाटत नाही, तो भाग वेगळा!) फिरायला जातांना तिथे पोहचण्यापेक्षा मला प्रवासाचं जास्त आकर्षण आहे. पण प्रवासाने माणूस संपन्न होतो, fresh होतो हे माझं मत आहे. तुझ्यासोबत असतांना बरोबर असलेले मित्र आणि त्यांच्यासोबत घडलेले किस्से लोकांना सांगतांना मला कधीच कंटाळा येत नाही. Dear longdrive, हे फक्त तुझ्यामुळे शक्य होतं!
फिरायला जाताना जशी मजा असते, तशीच फिरायला निघण्याआधीच्या तयारीचीही असतेच. मग ती trip family सोबत असो, मित्रांसोबत असो किंवा एकट्याने असो. सगळ्यात आधी कुठे जायचंय ते ठरवणं, त्यासाठी route ठरवणं, गाडी मिळवणं, सोबती तयार करणं, त्यांना सगळी idea देणं, सगळ्यांना निघण्याच्या दिवशी वेळेवर हजर करणं, आपल्या budget नुसार economically viable दौऱ्याचं नियोजन करणं, या आणि अशा गोष्टींत मी इतका तरबेज झालो आहे, की माझ्या या उत्कृष्ट trip organize करण्याकडे बघून पुढच्यावेळी तुझ्यासोबत 'मला घेऊन चला' म्हणणाऱ्यांची संख्याही भरपूर वाढली आहे. Dear longdrive, हे फक्त तुझ्यामुळेच शक्य होतं!
एखाद्या कंटाळवाण्या दुपारी आकाश भरून आलेलं असावं, आत्ताच झालं पाहिजे असं काही काम पडलेलं नसावं. सरळ गाडी काढावी आणि निघावं भटकायला! थोड्या अंतरानंतर गाडीने वेग पकडलेला असावा, भरून आलेल्या ढगांतून मुसळधार पाऊस सुरू व्हावा, काचेवर साचलेलं पाणी wiper ने इमाने इतबारे बाजूला सारणं सुरू करावं, Two-wheeler वर असलेले लोक पावसामुळे उडालेल्या त्रेधातिरपीटीतून वाचण्यासाठी एखाद्या आडोशाला उभे असल्याचं आपल्याला स्वच्छ झालेल्या काचेतून दिसावं, आणि background ला संदिपचं 'सरीवर सर' किंवा किशोरचं 'रिम झिम गिरे सावन' सुरू असावं मग तर, बहारच म्हणजे! या सगळ्या गोंधळातुन निसटून आपण एखाद्या घाटात आलेलो असावं, पावसाचा जोर थोडा ओसरलेला असावा, तिथे रस्त्याच्या कडेच्या डोंगरातुन पावसाचं पाणी खळखळत वाहत असावं जवळच एका टपरीवर चहा आणि मक्याचं कणीस भाजणं सुरू असावं आपण तिथे थांबावं आणि फक्कड चहाचा घोट घ्यावा! तसा चहा मला आवडत नाही, पण या वातावरणात आवडनिवड फिकी पडते. Dear longdrive, हे फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळेच शक्य होतं!
Lockdown नंतर Mission begin again सुरू झालं आहे, सगळीकडे सगळंच पूर्ववत होण्याला सुरुवात झाली आहे. तरीही भीतीचं सावट अजूनही कायम आहे. तुझ्याकडे येण्यासाठी लागणारं उत्साहपूर्ण वातावरण अजून व्हायला थोडा वेळ लागणार आहे. लवकरच मला तुझ्या सोबत कुठेतरी जाता येईल अशी अपेक्षा करूया, तोपर्यंत मला फक्त आहे ती तुझी आठवण आणि आपल्याला दोघांनाही सहन करावा लागणार आहे तो 'विरह'.
तुझाच,
Tumblr media
0 notes
Text
बऱ्याच दिवसांनंतर आज लिहायला घेतो आहे. मध्येमध्ये वेगवेगळे विषयही सुचत होतेच पण लिहिण्याचा 'mood' होत नव्हता. आणि पानभर लिहायचं असेल तर त्यासाठी आधी मणभर तयारी करावी लागते, त्यात मला हे असं लिहिणं अगदीच नवीन मला तर ती अधिकची करावी लागते! त्याचबरोबर blog वर लिहिण्याचंही बऱ्याच लोकांनी मला सुचवलं, तोही प्रयत्न आज करतो आहे. अगदीच प्राथमिक आहे हे पण मुख्य काय तर नवे नवे प्रयोग करून बघण्याची मजा मिळते आहे. तूर्त आजच्या विषयाकडे वळूया. Social media, TV, Mobile आणि computer च्या काळामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा ऱ्हास झाला असेल तर तो मराठीसारख्या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषांचा झाला आहे. एखादा लेख, पुस्तक, सर्वे किंवा वृत्तपत्र लिहि��ांना लेखकाला असं वाटत असावं की English शिवाय आपलं लिखाण पूर्ण होणार नाहीच. यातून एकतर त्याचं शब्दांचं दारिद्र्य दिसून येतं, किंवा आपण आपली भाषा सोडून दुसऱ्या भाषांवर किती विसंबून राहू लागलो आहोत हे दिसून येतं. मला English चा अजिबात दुस्वास नाही, उलट मराठीनंतर मला English बद्दल जास्त आपुलकी आहे. पण माझा आजचा विषय हा भाषेच्या अस्खलित वापराबद्दलचा आहे. भाषा हे अभिव्यक्तीचं मूळ साधन आहे. तेच जर यथातथा असेल, तर व्यक्त होणार कसं? कोणतीही भाषा आपण जेव्हा बोलतो / लिहितो मग ती मराठी असो, English असो, उर्दू असो किंवा हिंदी ती जर अस्खलितपणे आपल्याला बोलता / लिहिता येत असेल तर त्याची मजा वेगळी असते. नाहीतर आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याला मर्यादा येतात. साधं Taxi/रिक्षातून उतरल्यावर किंवा भाजी/फळं घेतल्यावरही 'कित्ते हुए भैय्या?' च्या ऐवजी 'किती झाले दादा?' हे म्हणण्यात कमीपणा काय आहे याचं कोडं मला उलगडलेलं नाही.
भाषेची आणखी एक व्याख्या म्हणजे मानवी भावनेला शब्दातून व्यक्त करणारं माध्यम. या व्याख्येत शत प्रतिशत मोडणाऱ्या मला माहीत असलेल्या भाषा म्हणजे संस्कृत, मराठी आणि हिंदी. आपण सध्या मराठीबद्दल बोलू. उदाहरणार्थ मराठीत 'आलिंगन देणे' असा वाक्प्रचार आहे. दोन व्यक्तींनी गळाभेट करणं यासाठी तो वापरतात. मिठी मारणे, कुशीत शिरणे, कवेत घेणे असेही त्याला पर्यायी वाक्प्रचार आहेत. पण प्रत्येकाचा संदर्भ वेगळा आहे. प्रत्येक वाक्प्रचारात त्या दोन व्यक्तींचं नातंही वेगवेगळं आहे. प्रत्येकामागची भावना वेगळी आहे. प्रत्येक भावनेसाठी मराठीत शब्द आहे. English मध्ये या सगळ्यांसाठी एकमेव 'Hug' हा शब्द आहे. यातून मराठीचं महत्व लक्षात येतं.
भाषेचा उपयोग करतांना दोन भाषांची सरमिसळही इतकी सराईतपणे केली जाते, की त्या खिचडीमुळे एखादं वाक्य हास्यास्पद होऊन जातं. भाषा मिसळून बोलण्याचं चांगलं उदाहरण म्हणजे 'वरचा मजला खाली आहे'. आता या वाक्यातून सांगणाऱ्याला असं सूचित करायचं आहे, की वरचा मजला रिकामा आहे. पण या हिंदी आणि मराठी मिश्रणात वाक्याचा घोळ झाला आहे. जो मजला 'वर' आहे, तो 'खाली' कसा असू शकतो! या अशा वाक्याने निव्वळ संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे झालं बोलण्याचं, लिहिण्याच्या बाबतीतही काही फार चांगली परिस्थिती आहे असंही नाही. एखाद्या (मराठी विषय वगळता) पदवीधर विद्यार्थ्याला एक उतारा आपल्या मातृभाषेत लिहून दाखवायला सांगितला तर त्याच्या झालेल्या अवस्थेची कल्पनाच केलेली बरी!
महाराष्ट्रात मराठीही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लहेजात बोलली जाते. मुंबईकडे काय सांगतो ला 'काय बोलतो' आणि नाही ला 'नाय' म्हणतात, तसंच पुण्यात खाली (down) ऐवजी 'खाल्ती', करूया च्या ऐवजी 'करूयात', सातारा कोल्हापूर कडे 'चालतंय की', कोकणची मराठी तर वेगळीच, जालना-परभणी कडे करतोय/होतंय ला करायलाय/व्हायलंय, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूरकडे 'करून राहला', पहिला(first)च्या ऐवजी पहला असा वैविध्यपूर्ण वापर होतो. त्या त्या भागाचा त्यांच्या मराठीत एक गोडवा आहे. पण वर्तमानपत्र किंवा पुस्तकांमध्ये जी मराठी लिहिली जाते ती फक्त औरंगाबादमध्येच आढळून येते. औरंगाबादने मराठीला काही महत्वाचे नवे शब्द बहाल केले असल्याचं मला तरी दिसलं नाही. हे माझं ढोबळ निरीक्षण आहे, यात मी १००% चूक असू शकतो.
भाषा हे प्रभुत्व मिळवण्याचं माध्यम आहे, लिहिण्या-बोलण्यातून आत्मविश्वास सिद्ध करण्याचं साधन आहे. पण कधीकधी स्वच्छ मराठीत लिहिलं किंवा बोललं जात असेल तर त्या व्यक्तीला अहंकार आहे, ती व्यक्ती शिष्ट आहे असं सरळसरळ गृहीत धरलं जातं! याचा मला अनुभव आहे. Lockdown च्या या रिकाम्या वेळेत ज्याप्रमाणे स्वयंपाक, व्यायाम आणि स्वतःकडे जसं लक्ष दिलं जातं आहे तसंच भाषा सुधारण्यासाठीही थोडं लक्ष दिलं तर उपयोगाचं होईल. नाहीतर आपलाही वरचा मजला 'खाली' आहे यावर शिक्कामोर्तब होईल, यात शंका नाही.!
1 note · View note